कसबे डिग्रजमध्ये ऊसतोडी बंद पाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:41 IST2017-10-31T00:37:12+5:302017-10-31T00:41:10+5:30
कसबे डिग्रज : ऊस दराच्या प्रश्नासाठी सोमवारी कसबे डिग्रज येथे शेतकरी व ग्रामस्थांनी परिसरातील ऊसतोडी रोखल्या

कसबे डिग्रजमध्ये ऊसतोडी बंद पाडल्या
कसबे डिग्रज : ऊस दराच्या प्रश्नासाठी सोमवारी कसबे डिग्रज येथे शेतकरी व ग्रामस्थांनी परिसरातील ऊसतोडी रोखल्या. दर जाहीर झाल्याशिवाय कुणीही तोडकरू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सोमवारी सकाळी हुतात्मा साखर कारखानाच्या ऊसतोडी गावात सुरू करण्यात आल्या होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गावातील शेतकरी, तरुण कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी ऊस मालक आणि तोडणी कामगारांना, दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करू नये, असे सांगितले. त्यानंतर तोडी बंद केल्या. यावेळी शेतकरी विनायक जाधव म्हणाले, दोन दिवसांत ऊस दराबाबत शासन आणि ऊस दर समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता ठरणार आहे. तोपर्यंत ऊस तोडी थांबवा.
यावर्षी चांगला दर मिळणार असून, सर्वांचा फायदा होईल.अमोल कदम, जिनेंद्र मिणचे, विपुल चौगुले यांच्यासह तरुण, शेतकरी यावेळी उपस्थित होते. सोमवारी आंदोलनात कोणत्याही संघटनेशिवाय शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने तिन्ही संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते. रविवारी वड्डी येथे शेतकरी संघटनेने तोडी रोखल्या होत्या. त्यामुळे दराचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आरग येथे ऊस तोड बंद पाडली
मिरज : उसाला पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आरग येथे ऊस तोड बंद पाडत मजुरांना हाकलून लावले. मिरज तालुक्यातील आरग बेडग हुलगिरी फाटा येथे सतीश साळुंखे यांच्या शेतात सुरू असलेली ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. आर. पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा साखर कारखान्याच्या ऊस तोड मजुरांना हाकलून लावत बंद पाडली. पहिला हप्ता साडेतीन हजार मिळावा, अशी जोरदार मागणी करीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.